Ad will apear here
Next
दादामुनी!


हिंदी चित्रपटांच्या दुनियेत संयत अभिनयासाठी मैलाचा दगड मानले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार उर्फ दादामुनी यांचा आज (१० डिसेंबर २०२०) १९वा स्मृतिदिन. विविध पद्धतीच्या भूमिका सहजतेने पार पाडणाऱ्या दादामुनींच्या सदैव टवटवीत स्मृतींना आदरांजली.

चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ बनण्यासाठी मुंबईत येऊन बॉम्बे टॉकीजमध्ये काम करू लागलेले कुमुदलाल गांगुली कॅमेऱ्यासमोर अभिनेता म्हणून उभे राहिले व ‘अशोक कुमार’ बनले, हा केवळ योगायोग.



१९३६मध्ये बॉम्बे टॉकीजमध्ये ते लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम करत असताना मालक हिमांशू रॉय यांनी ‘जीवन नैया’ या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली होती. रॉय यांच्या पत्नी देविका राणी नायिका होत्या; पण ऐन वेळी चित्रपटाचा नायक देविका राणींना घेऊन पसार झाला. पुढे त्या परतल्या पण रॉय यांनी त्या अभिनेत्याला माफ केले नाही. त्याच्या ऐवजी तरुण नवख्या कुमुदलालच्या चेहऱ्यावर मेकअप करण्याचे फर्मान सुटले.

नाइलाज म्हणून व स्वत:च्या इच्छेविरुद्ध ते कॅमेऱ्यासमोर उभे राहिले व हिंदी चित्रपटसृष्टीला एक बहुआयामी ताकदीचा अभिनेता गवसला. १९३६पासून पुढील पाच दशके अशोक कुमार हिंदी चित्रपटात तळपत राहिले. प्रणयी नायकापासून चरित्र अभिनेत्यापर्यंत व विनोदी भूमिकांपासून खलनायकापर्यंत सर्व पद्धतीची कामे त्यांनी केली.



‘अछूत कन्या’, ‘किस्मत’, ‘भाई-भाई’, ‘महल’, ‘आशीर्वाद’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांनंतर त्यांनी किशोर कुमार व अनुप कुमार हे आपले दोन भाऊ, तसेच मधुबाला यांच्या साथीने ‘चलती का नाम गाडी’ हा अफलातून सिनेमा केला. नंतर ‘व्हिक्टोरिया २०३’मध्ये ते व प्राण यांनी विनोदाची जुगलबंदी पेश केली.

दादामुनींना गाता गळा होताच, शिवाय ते उत्तम चित्रकार व होमिओपॅथीचे तज्ज्ञही होते. १० डिसेंबर २००१ रोजी वयाच्या ९०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

हिंदी चित्रपटसृष्टीचा खराखुरा ‘दादामुनी’ (थोरला भाऊ) हीच त्यांची खरी ओळख!

- भारतकुमार राऊत

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UVQICT
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
‘ल्युटिन्स’चा कर्ता ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language